लाच प्रकरणातील आरोपी मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या सीलबंद घरातून कोट्यवधींचे घबाड; एसीबीची ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती

Jul 3, 2026 - 18:05
 0
लाच प्रकरणातील आरोपी मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या सीलबंद घरातून कोट्यवधींचे घबाड; एसीबीची ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती
AI Photo Generate

जळगाव : जळगाव शहरातील मूळ रहिवासी तथा सध्या अकोला येथे मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले लाच प्रकरणातील आरोपी किरण चौधरी यांच्या विरोधातील तपासाला नवे वळण मिळाले आहे. नाशिक आणि जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) संयुक्त पथकाने जळगाव शहरातील त्यांच्या सीलबंद निवासस्थानाची अत्यंत गोपनीय पद्धतीने ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती घेतली. या कारवाईदरम्यान सोने, चांदी, रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.

किरण चौधरी यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी अकोला येथे लाचखोरीच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर जळगाव शहरातील साईप्रभा आर्केड अपार्टमेंटमधील त्यांचे निवासस्थान सील करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला.

दरम्यान, सीलबंद घरात घुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात चौधरी यांच्या दोन नातेवाईकांनी सील असलेल्या घरात प्रवेश करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले.

या घटनेनंतर चौधरी यांचे निवासस्थान पुन्हा सील करण्यात आले असून तेथे कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एसीबीकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची आणि कागदपत्रांची सखोल छाननी सुरू असून, बेहिशेबी मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचा तपास सुरू आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे जळगावसह राज्यातील महसूल व मुद्रांक विभागात मोठी खळबळ उडाली असून, तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loksawal News Loksawal Large Marathi news Network in Maharashtra.