कन्नड येथे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय क्र. २ कार्यान्वित भूमी अभिलेखातील दुरुस्ती व अपील प्रकरणांच्या सेवा नागरिकांना होणार जलद उपलब्ध
छत्रपती संभाजीनगर, दि.७ (जिमाका) : कन्नड शहर व परिसरातील नागरिकांना भूमी अभिलेखाशी संबंधित विविध सेवा जलद, सुलभ आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उपसंचालक भूमी अभिलेख, छत्रपती संभाजीनगर प्रदेश यांच्या अधिपत्याखाली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, छत्रपती संभाजीनगर क्र. २, मुख्यालय कन्नड हे नवीन कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. या कार्यालयामार्फत दि. १५ जून २०२६ पासून नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
नवीन कार्यालय संतराम कॉम्प्लेक्स, शरद पवार कॉलनीसमोर, चाळीसगाव रोड, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर-४३११०३ येथे सुरू करण्यात आले आहे. भूमी अभिलेखाशी संबंधित कामांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा व्हावा, या उद्देशाने शासनाने हे कार्यालय कार्यान्वित केले आहे.
या कार्यालयामार्फत नगर भूमापन अभिलेखामध्ये अनवधानाने झालेल्या त्रुटींची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामध्ये क्षेत्र दुरुस्ती, नाव दुरुस्ती, सत्ता प्रकार दुरुस्ती तसेच अपील प्रकरणे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ७/१२ अभिलेखातील क्षेत्र, नाव, गट क्रमांक आदी बाबींशी संबंधित दुरुस्तीची प्रकरणेही नियमानुसार हाताळण्यात येणार आहेत.
तसेच एकत्रीकरण कायद्यांतर्गत अभिलेखामध्ये अनवधानाने झालेल्या चुका तसेच संबंधित कायद्यातील कलम ३१ (अ) व ३२ अंतर्गत येणारी दुरुस्तीची कामे या कार्यालयामार्फत करण्यात येणार आहेत. संबंधित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करून नागरिकांना भूमी अभिलेखविषयक सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
कन्नड व परिसरातील नागरिकांनी भूमी अभिलेखाशी संबंधित व या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या प्रकरणांसाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, छत्रपती संभाजीनगर क्र. २, मुख्यालय कन्नड या कार्यालयाशी संपर्क साधून उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

