कचरा टाकणाऱ्यांवर मनपाची कडक कारवाई; १० हजारांचा दंड
छत्रपती संभाजीनगर : शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महानगरपालिकेने 'शून्य सहनशीलता' (Zero Tolerance) धोरण स्वीकारले असून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे.
मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या नेतृत्वाखाली व स्वच्छता अधिकारी अनिल जाधव यांच्या सूचनेनुसार मुख्य स्वच्छता निरीक्षक शेख अन्वर यांच्या पथकाने कारवाई केली. हर्सूल परिसरात कचरा टाकणाऱ्या संबंधित व्यक्तीवर १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई मुख्य स्वच्छता निरीक्षक शेख अन्वर शेख दादाभाई, स्वच्छता निरीक्षक वंदना पवार, नागरिक मित्र निरीक्षक देविदास सुसर, बालाजी साबळे तसेच किशोर मगरे यांच्या सहभागातून करण्यात आली.
यापुढेही शहरात स्वच्छता राखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशाच प्रकारे कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता महानगरपालिकेच्या स्वच्छता उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

