मोहम्मद सिराजने बदलला 91 वर्षांचा इतिहास, कोणत्याही भारतीय खेळाडूला हे जमलं नाही

Jul 2, 2024 - 16:16
 0
मोहम्मद सिराजने बदलला 91 वर्षांचा इतिहास, कोणत्याही भारतीय खेळाडूला हे जमलं नाही

कोलंबो: भारतीय संघाने आशिया चषक २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे. या विजेतेपदकाचे
सर्वात मोठे श्रेय जाते ते म्हणजे मोहम्मद सिराजला. मोहम्मद सिराजने त्याच्या करियरमधील सर्वात बेस्ट गोलंदाजी स्पेल टाकत एकट्याने श्रीलंकेच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्याच्या गोलंदाजीवर ३ फलंदाज हे खाते न उघडताच बाहेर गेले. सिराजने सामन्यातील चौथ्या षटकात ४ विकेट्स घेत श्रीलंकेचे आव्हान जवळजवळ संपुष्टात आणले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो मैदानात उतरताच चुकीचा ठरला. टीम इंडियाच्या वेगवान आक्रमणाने लंकेला येताच उद्ध्वस्त केले. युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने अवघ्या १५ चेंडूत ५ विकेट घेत ९१ वर्षांचा इतिहास बदलला आहे. मोहम्मद सिराजचा कहर इथेच थांबला नाही, तो तिसरे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने कर्णधार दासून शनाकालाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. १९३२ मध्ये भारताने क्रिकेट विश्वात पदार्पण केले पण, ९१ वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये असा एकही गोलंदाज नाही ज्याने एका षटकात ४ विकेट्स घेऊन विरोधी संघाला जेरीस आणले. अंतिम फेरीत सिराजने अवघ्या १६ चेंडूत आपले ५ विकेट्स पूर्ण केले आणि श्रीलंकेला गुडघे टेकण्यास भाग पाडले.


मोहम्मद सिराज जगात चौथ्या क्रमांकावर आहे

श्रीलंकेच्या संघाचा धुव्वा उडवून सिराज जगात चौथ्या स्थानावर आला आहे. त्याच्या आधी जगात फक्त तीनच गोलंदाज आहेत ज्यांनी एका षटकात चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. चामिंडा वास याने हा पराक्रम केला होता. यानंतर मोहम्मद सामी, आदिल रशीद यांनी ही कामगिरी केली आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५ बळी घेणारा सिराज पहिला भारतीय आणि जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद सिराजने या सामन्यात सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहने श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच षटकात विकेट घेतली. यानंतर षटक टाकण्यासाठी आलेल्या सिराजने एकहाती लंकेचा धुव्वा उडवला. श्रीलंकेने १२ धावांत आपले ६ फलंदाज गमावले होते. त्याचवेळी टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानेही वाहत्या गंगेत हात धुवून ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या. भारताच्या वेगवान आक्रमणाने श्रीलंकेचा डाव अवघ्या ५० धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने अवघ्या ६.१ षटकांत जेतेपद पटकावले. शुभमन गिल आणि इशान किशन यांनी शानदार फलंदाजी करत संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला.