जिल्ह्यात पाच डेपोंवर ६१ हजार ब्रास वाळू उपलब्ध; खरेदीसाठी नागरिकांनी मागणी नोंदवावी

Mar 7, 2025 - 12:46
 0
जिल्ह्यात पाच डेपोंवर ६१ हजार ब्रास वाळू उपलब्ध;  खरेदीसाठी नागरिकांनी मागणी नोंदवावी

औरंगाबाद : घरकुल लाभार्थ्यांसाठी , नागरिकांसाठी, खाजगी प्रकल्प आणि शासकीय कामांसाठी लागणाऱ्या वाळूची डेपोनिहाय उपलब्धता जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत पाच डेपोंवर सर्व मिळून ६१ हजार ०७७.०१ ब्रास वाळू उपलब्ध आहे. ही वाळू रितसर मागणी नोंदवून व शुल्क भरुन उपलब्ध आहे. घरकुल लाभार्थ्यांना  ५ ब्रास वाळू मोफत उपलब्ध आहे,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना बांधकाम योग्य वाळू खरेदीसाठी जिल्हा खनिकर्म विभागामार्फत वाळू घाट व वाळू डेपो येथे उपलब्ध वाळूबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच वाळू खरेदीबाबत सुचनाही जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी दिल्या आहेत.

त्यानुसार वाळू खरेदीसाठी ग्राहकास सेतु केंद्र छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय आवार किंवा सर्व तहसिल कार्यालयाचे सेतु व इतर १४५ सुविधा केंद्रात जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. गरजेनुसार नागरिकांनी वाळु खरेदीसाठी मागणी नोंदवावी.

घरकुल लाभार्थी व सर्वांना वाळूची नोंदणी करतांना २५रुपये सेतु नोंदणी शुल्क  जमा करावे लागेल. नोंदणी करतांना रेशन कार्ड, आधार कार्ड, घरकुल प्रमाणपत्र बांधकाम परवानगी सोबत आवश्यक घेऊन यावे. तसेच नोंदणी करतांना मोबाईल क्रमांक अनिवार्य असून OTP साठी मोबाईल सोबत घेऊन यावेत. घरकुल योजनेतील लाभार्थी यांना ५ ब्रास वाळू मोफत मिळेल.

एका कुटुंबास एका वेळी कमाल १० ब्रास इतक्या मर्यादेत वाळू मिळेल. नंतर वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर वाळूची मागणी ग्राहकास करता येईल. नोंदणी झाल्यानंतर बुकींग ID  असलेली पावती प्राप्त करुन सदर पावती वाळु डेपोवरील डेपोमॅनेजरला दाखवून वाहतुक पावती प्राप्त (ETP) करुन घ्यावी. डेपोपासून बांधकाम ठिकाणचा वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी नोंदणी केलेल्या व्यक्तीची राहील. शासनाच्या अधिकृत वाळू डेपो वरुन वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी महाखनिज वेबसाइटवर ट्रापोर्टर म्हणून करणे गरजेचे आहे. सदर वाहनांवर AIS-140(IRNSS) प्रमाणिकरण असलेली जीपीएस यंत्रणा आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

डेपोनिहाय वाळू उपलब्धता

ब्रम्हगाव ता. पैठण- नागरिकांसाठी ३५९०.७० ब्रास, बुकिंगसाठी प्रतिब्रास शुल्क २०२२.०२ रुपये.

हिरडपुरी ता. पैठण-घरकुल लाभार्थ्यांसाठी १०६००.०८ ब्रास, नागरिकांसाठी २३८५१.०८ ब्रास, खाजगी             प्रकल्पांसाठी १०६००.०८ ब्रास,  शासकीय कामांसाठी ७९५०.०६, बुकिंगसाठी प्रतिब्रास शुल्क ८०७.०२ रुपये.

गेवराई गुंगी ता. फुलंब्री- नागरिकांसाठी २०१९.२४, बुकिंगसाठी प्रतिब्रास शुल्क १५७२.०२ रुपये.

मोढा खु. ता. सिल्लोड- घरकुल लाभार्थ्यांसाठी १५९.११ ब्रास, नागरिकांसाठी ८९९.४९ ब्रास, बुकिंगसाठी प्रतिब्रास             शुल्क २४५४.०२ रुपये.

डाग पिंपळगाव ता. वैजापूर- नागरिकांसाठी १४०७.१७ ब्रास, बुकिंगसाठी प्रतिब्रास शुल्क १३११.०२ रुपये.

एकूण जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी १० हजार ७५९.१९ ब्रास, नागरिकांसाठी ३१ हजार ७६७.६८ , खाजगी             प्रकल्पांसाठी १०६००.०८ ब्रास तर शासकीय कामांसाठी ७९५०.०६ ब्रास अशी वाळू उपलब्धता आहे.

Loksawal News Loksawal Large Marathi news Network