भारत मध्ये तालिबान मंत्री मुतक्की यांच्या दौर्यात पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेशबंदी

अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी भारत दौर्यावर; जयशंकर यांच्याशी झाली महत्वाची चर्चा, पत्रकार परिषदेत महिलांना प्रवेशबंदीमुळे वाद.
नवी दिल्ली – अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी हे सात दिवसांच्या भारत दौर्यावर गुरुवारी आले असून, त्यांच्या या दौर्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष लक्ष वेधले आहे. दौर्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार, मानवीय सहाय्य, आणि सुरक्षा सहकार्य यांसारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. मुत्ताकी यांनी भारताला आश्वासन दिले की, “अफगाणिस्तानची जमीन कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही इतर देशाविरुद्ध वापरली जाणार नाही,” असे ते म्हणाले.
मात्र, मुत्ताकी यांच्या या दौर्यात एक वादही उद्भवला आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान महिला पत्रकारांना प्रवेशबंदी घालण्यात आली, ज्यामुळे माध्यमविश्वातून आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लिंगसमानतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांत संवेदनशील टप्प्यावर आहेत. तालिबानच्या सत्ताग्रहणानंतर भारताने आपल्या दूतावासातील कामकाज मर्यादित केले होते, मात्र आता व्यापार आणि मानवीय सहाय्याच्या माध्यमातून संबंध पुन्हा सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुत्ताकी यांचा हा दौरा या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे.