जालन्यात जमिनीतून 'लावा' नव्हे, तर 'शॉर्ट सर्किट'मुळे वितळले दगड; महावितरणचे स्पष्टीकरण

Apr 7, 2026 - 09:45
 0
जालन्यात जमिनीतून 'लावा' नव्हे, तर 'शॉर्ट सर्किट'मुळे वितळले दगड; महावितरणचे स्पष्टीकरण

जालना जिल्ह्यातील एका भागात जमिनीतून लाव्हा सदृश द्रव बाहेर येत असल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. ज्वालामुखीचा उद्रेक की आणखी काही? अशा चर्चांना उधाण आले असतानाच, महावितरण कंपनीने या घटनेमागचे तांत्रिक कारण स्पष्ट करत अफवांना पूर्णविराम दिला आहे.

​नेमकी घटना काय?

​जालन्यातील एका भागात जमिनीतून अचानक लाव्हा रसासारखा लालभडक तप्त पदार्थ बाहेर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. हा पदार्थ इतका उष्ण होता की जमिनीतील दगड गोट्यांचे पाणी होत असल्याचे चित्र दिसत होते. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

​महावितरणचे तांत्रिक स्पष्टीकरण

​या घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासणी केली. महावितरणने जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या अहवालानुसार:

​तांत्रिक बिघाड: ११ केव्ही (11kv) सॅटेलाइट फीडरचा विद्युत वाहक तार (Conductor) एका खराब 'पिन इन्सुलेटर'मुळे 'V-क्रॉस आर्म' आणि 'RSJ पोल'च्या थेट संपर्कात आला.

​उच्च दाब प्रवाहाचा परिणाम: पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने (Electrocution) तो जमिनीत प्रवाहित झाला.

​खडकाळ जमिनीमुळे उष्णता: या भागातील जमीन खडकाळ असल्याने, उच्च दाबाच्या वीज प्रवाहामुळे प्रचंड उष्णता निर्माण झाली. या उष्णतेने जमिनीतील दगड चक्क वितळले आणि ते लाव्हा रसासारखे बाहेर दिसू लागले.

​परिस्थिती आता नियंत्रणात

​महावितरणने तातडीने पावले उचलत दुपारी ४:४५ वाजता हा तांत्रिक बिघाड दुरुस्त केला आहे. खराब झालेले इन्सुलेटर बदलून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, सध्या परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे.

​"हा कोणताही नैसर्गिक ज्वालामुखी नसून केवळ विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे खडकाळ जमिनीत निर्माण झालेल्या उष्णतेचा परिणाम होता. नागरिकांनी घाबरून जाऊ नये." असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Loksawal News Loksawal Large Marathi news Network in Maharashtra.