Pahalgam Terror Attack: अतिरेक्यांना अन् हल्ल्याच्या कट रचणाऱ्यांना नरेंद्र मोदी यांचा कठोर संदेश

काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. पहलगाममध्ये दशतवादी हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात होते. ते आपला दौरा रद्द करुन तातडीने भारतात आले. त्यानंतर त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेते पाकिस्तानवर कठोर कारवाई सुरु केली. सिंधू पाणी करार रद्द करत इतर पाच मोठे निर्णय घेण्यात आले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी यांची पाहिलीच जाहीर सभा गुरुवारी झाली. राष्ट्रीय पंचायत दिनानिमित्त बिहारमध्ये मुधबनी येथे ही सभा घेतली. हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर कठोर शब्दांत पाकिस्तानचे नाव न घेता संदेश दिला.
मोदी भाषणात काय म्हणाले?
पहलगाममधील हल्ल्यानंतर संपूर्ण देश दु:खी झाला आहे, असे सांगत नरेंद्र मोदी म्हणाले, या हल्ल्यात काहींना आपला मुलगा गमावला. काहींनी आपला भाऊ गमावला. कोणी आपला जीवनसाथी गमावला. त्यातील अनेक जण देशातील वेगवेगळ्या भाषा बोलत होते. त्या सर्वांच्या मृत्यूवर आमचा आक्रोश, दु:ख एक सारखे आहे. हा हल्ला म्हणजे भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा प्रकार आहे. ज्यांनी हा हल्ला केला, त्या अतिरेक्यांना आणि या हल्ल्याच्या कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळणार आहे. आता दहशतवाद्यांना मातीत घालण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आतंकीच्या आकांची कंबर तोडल्याशिवाय राहणार नाही. अतिरिक्यांचे नामोनिशान मिटवणार असल्याचा कठोर संदेश नरेंद्र मोदी यांनी दिला.