-->
मूकनायकच्या 104 व्या वर्धापनदिनानिमित्त 'पत्रकारितेचे मानवतावादी दृष्टीकोनातून चळवळीसाठी योगदान' या विषयावर वैचारीक प्रबोधनात्मक कार्यशाळा संपन्न.

मूकनायकच्या 104 व्या वर्धापनदिनानिमित्त 'पत्रकारितेचे मानवतावादी दृष्टीकोनातून चळवळीसाठी योगदान' या विषयावर वैचारीक प्रबोधनात्मक कार्यशाळा संपन्न.



औरंगाबाद (प्रतिनिधी) : समाज जीवनात कार्यरत फुले शाहू आंबेडकराईट विचारधारेच्या हितचिंतकांना जागृत करून वैचारिक आंदोलनाचा कारवाँ पुढे घेऊन जाण्यासाठी समग्र आंदोलन समजून घेणे आवश्यक आहे. आपण सर्वांना ज्ञात आहेच की, 31 जानेवारी 1920 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक या पाक्षिकाची सुरुवात केली होती. याची ऐतिहासिक जाणीव ठेवून वर्तमान काळात आपण कुठे आहोत? समग्र चळवळीचे नेतृत्व, कार्यकर्ते, संस्था, संघटना, अनुयायी, हितचिंतक नेमके काय करीत आहेत? यावर नव्याने विचारमंथन व्हावे म्हणून मूकनायक च्या 104 व्या वर्धापनदिनानिमित्त मूकनायक सप्ताह अंतर्गत वैचारिक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळेचे 28 जानेवारी 2024 ला आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन निळे प्रतिक चे संपादक रतनकुमार साळवे यांनी केले. ते याप्रसंगी म्हणाले की, 31 जानेवारी 1920 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मूकनायकचे चळवळीसाठी योगदान लक्षात घेऊन फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलच्या माध्यमातून संचालक बी. बी. मेश्राम यांनीयांनी आर्थिक व्यवहार बाजूला ठेवून आपली भूमिका पार पाडली पाहिजे म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. हा एक समाजाला दिशा देणारा स्तुत्य उपक्रम आहे. याची आपण नोंद घेतली पाहिजे. त्यांची तळमळ लक्षात घेता चळवळीचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी ही कृतीशीलता निश्चितच वाखाणण्यासारखी आहे. ज्या चळवळीचे वर्तमान पत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षा प्रमाणे होते. असे बाबासाहेब म्हणाले होते म्हणून विषमतेचे माहेरघर असलेल्या भारत देशात विषमतेची दरी रुंदावत चालली असताना समता प्रस्थापित करण्यासाठी त्या काळात मूकनायकचा जन्म झाला होता. मूकनायक हे एक न्यायाचे विचारपीठ होते.

या प्रसंगी एस. पी. मुंजाळ म्हणाले की, आपल्या कार्याला इतर वृत्तपत्रात पुरेशी जागा मिळत नसल्याने बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्रपणे आपल्या मूकनायक या पाक्षिकाची स्थापना केली. एड. विलास रामटेके म्हणाले की, मानवी मूल्यांवर आधारित विचार जगले पाहिजेत. विषमतेची दरी नष्ट करण्यासाठी जनतेचे प्रबोधन नीट झाले तर जनता त्या विचाराने पेटून उठेल. कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी ही कार्यशाळा महत्वपूर्ण ठरत आहे. लहान मुलांप्रमाणे कार्यकर्त्यांवर संस्कार केले पाहिजेत. समाजातील ओबीसी, मराठा बांधव दुखावणार नाहीत, याची जाणीव ठेवून त्यांना जोडले पाहिजेत. धनराज गोंडाने म्हणाले की, कोणत्याही चळवळीला यशस्वी होण्यासाठी वृत्तपत्राची नितांत आवश्यकता आहे. 14 फेब्रुवारी 1920 ला बाबासाहेब म्हणाले होते की, इंग्रजी भाषा हे वाघिणीचे दुध आहे. पांडुरंग नंदराम भटकर हे त्या पत्रिकेचे संपादक होते. बाबासाहेब सुद्धा त्या काळात पत्रिका वाटायचे. करिता आपण निर्भीडपणे पत्रकारिता चालविली पाहिजे. आमच्या बहिष्कृत लोकांवर होणा-या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मूकनायकने पार पाडले. स्वहित जोपासताना समाजहित जोपासले पाहिजे. एड. राजू बागूल म्हणाले की, भारत देश विषमतेचे माहेरघर असून यात आप्रेस्ड, डिप्रेस्ड आणि सप्रेस्ड लोक राहायचे त्यांच्या उत्थानासाठी मूकनायकची सुरुवात झाली होती. आवाज इंडिया, दलित दत्तक सारख्या प्रसार माध्यमांची भूमिका आपण समजून घेणे आवश्यक आहे. तराळ-अंतराळ चे लेखक शंकरराव खरात यांनी पत्रकारितेची मजबूत भूमिका पार पाडली. पुढे ते विद्यापीठाचे कुलगुरू झालेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा माणूस हा केंद्रबिंदू होता. म्हणून त्यांनी पुढे मानवतावादी दृष्टीकोनातून भारताचे संविधानाची निर्मिती केली आहे.
प्रमुख वक्ते समाधान ओंकार इंगळे म्हणाले की, लोकशाहीच्या उत्थानासाठी जनतेचे जनमत घडविण्याकरिता पत्रकारिता हा आजचा ज्वलंत विषय आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेवर त्यांचे गुरुवर्य जान ड्युई यांच्या विद्वत्तेचा गाढा प्रभाव होता. म्हणून त्यांनी प्रबुद्ध भारताच्या उभारणीसाठी आपले आयुष्य वेचले. मानवतावादी दृष्टीकोनातून प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत प्रस्थापित केला पाहिजे. समाजवादी, साम्यवादी हे धर्म, अंधश्रद्धेचे प्रचार प्रसार करून त्यांची उद्दिष्टे पूर्ण करतात. बहुसंख्यांक समाज विभाजित असल्याने त्या विभाजित गटातील अल्पसंख्याक समाजाचे होकायंत्र दिशाहीन होत असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. करिता आपण सजग राहून मार्गक्रमण केले पाहिजे.
कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप करताना फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलचे संचालक बी. बी. मेश्राम म्हणाले की, जनतेचे जनमत तयार करण्यासाठी वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम आहे. वृत्तपत्र वाचत असताना वाचकांनी दोन ओळीतील व दोन ओळी मागील ( Between the lines and Behind the lines) सामावलेला गर्भितार्थ समजून घेतला पाहिजे. समाज जीवनात रस्त्यावर आंदोलन चालविण्यासाठी त्याची योजना मात्र अशाप्रकारच्या कार्यशाळेत अंतर्गत बंद दाराआड ठरविण्यात आली पाहिजे म्हणून कार्यशाळेचे चळवळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्थळ, काळ, वेळ आणि परिस्थितीचा विचार करून समयसूचकतेनुसार मार्गक्रमण केले पाहिजे. निष्पक्ष पत्रकारिता चालविण्यासाठी वृत्तपत्राचे संपादक मंडळ कसे असावे? याची संहिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 9 मार्च 1940 च्या जनता पत्रात अंतर्भूत केली आहे. त्याची आपण अंमलबजावणी केली पाहिजे. तत्कालीन परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले? असा प्रश्न विचारला होता. आज वर्तमानात देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेससह युपीए आणि भाजपासह एनडीए यांनी मूलनिवासी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी काय केले आहे? देशाच्या अर्थसंकल्पात संवैधानिक समूहांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद केली जात आहे काय? असे प्रश्न आपण वर्तमान व्यवस्थेला विचारले पाहिजेत. एका काळात वृत्तपत्रे छापून विकली जात होती. आता मात्र प्रस्थापित वृत्तपत्राविषयी शंका आहे की, काय ती वृत्तपत्रे विकून छापली जातात? असे असेल तर कुठली वृत्तपत्रे विकत घेऊन आपण वाचली पाहिजेत? हे आपण ठरविले पाहिजे. करिता परिवर्तनवादी विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या वृत्तपत्रांना वाचकवर्ग मिळावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. सध्या आपल्या बातम्यांना दैनिक सार्वभौम राष्ट्र, दैनिक यश सिद्धी, दैनिक तुफान क्रांती, दैनिक क्रांती शास्त्र, दैनिक महावृत्त, दैनिक घटनेचा शिल्पकार, दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक सामना, दैनिक लोकपत्र, दैनिक मुक्तनायक, निळे प्रतिक, पैगाम, बहुजन हिताय, लोक प्रसार, हिंदवी समाचार, लोक परिषद, विचार क्रांती न्यूज इत्यादी वृत्तपत्रे ठळक प्रसिद्धी देऊन परिवर्तनवादी विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सहकार्य करीत आहेत. या सर्वांचेच सहकार्य आपणास विसरता येणार नाही. तरी परिवर्तनवादी विचारांच्या वृत्तपत्राना जगविण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करून धोक्यात आलेली लोकशाही वाचविली पाहिजे. तरच भारताचे संविधान अबाधित राहून समता, स्वतंत्रता, बंधुता व न्यायावर आधारित समाज निर्माण होऊ शकेल. हे करू शकलो तरच मूकनायकचे ऐतिहासिक महत्त्व आपणास कळाले असा त्याचा अर्थ होईल. म्हणून भिन्न भिन्न विषयावर सातत्याने वैचारिक प्रबोधनात्मक कार्यशाळेचे आयोजन करून आपण ऐतिहासिक चळवळीच्या इतिहासाला समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.

कार्यशाळेला एस. पी. मुंजाळ, एड. विलास रामटेके, डी. टी. कांबळे, लोक परिषद चे संपादक प्रवीण बुरुडे, एड. राजू बागूल, धनराज गोंडाने, समाधान ओंकार इंगळे, निळे प्रतिक चे संपादक रतनकुमार साळवे, बी. बी. मेश्राम इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते. अशाप्रकारे आभार प्रदर्शनाने हर्षोल्हासात कार्यशाळेची सांगता झाली.

0 Response to "मूकनायकच्या 104 व्या वर्धापनदिनानिमित्त 'पत्रकारितेचे मानवतावादी दृष्टीकोनातून चळवळीसाठी योगदान' या विषयावर वैचारीक प्रबोधनात्मक कार्यशाळा संपन्न."

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe