
राशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश
औरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, जिल्हा दक्षता समिती आणि भाववाढ सनियंत्रण समितीची बैठक श्री. गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस नानक वेदी, एकनाथ गवळी, जिजा मते, मो.साबेर अजिज शेख, रमेशचंद्र खराडे, रावसाहेब नाडे, राजेश मेहता, स्वाती नागरे, संगीता धारुरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर, आर.डी.दराडे, र.वि आकुलवार आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गव्हाणे म्हणाले, शासन निर्णयानुसार सर्वांना धान्याचा पुरवठा करावा. लाभार्थ्यापर्यंत धान्य पोहोचल्याची खात्री तलाठी यांनी करावी. रास्तभाव धान्य, सेतू सुविधा केंद्रांनी ठळक अक्षरात व दर्शनी भागात फलकावर देत असलेल्या सेवांचे दर लावावेत. सध्याच्या कोविड-19 संकटकाळात तालुकास्तरावर सायबर साक्षरता, ऑनलाईनच्या साहाय्याने ग्राहक, नागरिकांची होणार फसवणूक थांबविण्यासाठी साक्षरता अभियान जागृती राबवावी. वेबिनारच्या माध्यमातून ग्राहकांना साक्षर करावे. समिती सदस्यांनीही वस्तूनिष्ठ तक्रारी द्याव्यात, त्या तक्रारींवरही तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असेही गव्हाणे म्हणाले.
बैठकीत गवळी, मेहता, नाडे, वेदी, श्रीमती नागरे आदींनी विविध मुद्दे मांडत सर्वांनी प्रशासन करत असलेल्या जनहित कार्याचे कौतुक केले. त्याचबरोबर आवश्यक त्या सूचनाही केल्या. सर्व सदस्यांच्या सूचनांची दखल घेत त्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे गव्हाणे म्हणाले.
बैठकीमध्ये कारगील विजय दिनानिमित्त शहीद जवानांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रशानाकडून राबविलेल्या विविध योजनांची माहिती भारस्कर यांनी उपस्थितांना दिली.
0 Response to "राशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश"
टिप्पणी पोस्ट करा