
शाळा सुटली, स्विटी घराकडे निघाली; गावाजवळ पोहोचताच नियतीनं घात केला
शाळेतून घरी येण्यासाठी स्विटी सायकलवरून निघाली. तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी होत्या. स्विटी गावाजवळ पोहोचली. तिचं घर अगदी काही मिनिटांवर होतं. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
गडचिरोली: शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे आपल्या घरी परतताना मेघगर्जनेसह वीज कोसळल्यानं नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात ही घटना घडली. स्विटी बंडू सोमणकर असं विद्यार्थिनीचं नाव आहे.चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा केंद्रातील विश्वशांती विद्यालय, कुनघाडा येथे इयत्ता नवव्या वर्गात शिक्षण घेत होती. मालेर चक येथून कुनघाडा या गावाचे अंतर दोन किलोमीटर आहे. स्विटी नेहमीप्रमाणे आपल्या गावातील विद्यार्थ्यांनीसोबत सायकलने निघाली. आज (१८ मार्च) सकाळची शाळा आटोपून ती साडे दहाच्या सुमारास सायकलनं घरी येत होती. अगदी गावाजवळ येताच वीज कोसळली. यामुळे स्विटीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे तिच्या मागे-पुढे आणखी काही शाळकरी मुली होत्या. मात्र त्या काही अंतरावर असल्यानं त्यांना इजा झाली नाही, अशी माहिती केंद्रप्रमुख गोमासे यांनी दिली.
0 Response to "शाळा सुटली, स्विटी घराकडे निघाली; गावाजवळ पोहोचताच नियतीनं घात केला"
टिप्पणी पोस्ट करा