
खासगी बस-ट्रॅक्टरचा अपघात;१ ठार
फुलंब्री, (प्रतिनिधी) औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील आळंद परिसरात ट्रॅव्हल्स बस व ट्रॅक्टरचा अपघात होऊन एक तरुण प्रवासी जागीच ठार झाला. गुरुवारी (१७ मार्च) सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस (क्र. एम. एच. ०९/ सी. ए. १८२२) ही पुणे येथून भुसावळ येथे जात होती. गुरुवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास आळंद परिसरातील श्रीखंडे हॉस्पिटलच्या जवळ या भरधाव बसने ट्रॅक्टरला धडक दिली. त्यामध्ये बसमधील प्रवासी गणेश उमाकांत चौधरी (वय २३ वर्षे, रा. पुंडखेडा, ता. रावेर, जि. जळगाव) हा मरण पावला. या अपघातात बसच्या चालकाच्या बाजूचा चुराडा झाला. या घटनेची माहिती मिळताच फुलंब्री येथील रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी गणेश चौधरी यास फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. गणेशचे शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मयत गणेशच्या नातेवाइकांच्या फिर्यादीवरून दोन्ही वाहनचालकांवर वडोदबाजार पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0 Response to "खासगी बस-ट्रॅक्टरचा अपघात;१ ठार"
टिप्पणी पोस्ट करा