-->
शहागंज येथे शासकीय स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारावे – खासदार इम्तियाज जलील

शहागंज येथे शासकीय स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारावे – खासदार इम्तियाज जलील

गोरगरीब महिलांना मिळणार अद्यावत वैद्यकीय सेवा; तात्काळ प्रस्ताव सादर करावे, 

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद अंतर्गत दुर्गाप्रसाद आरोग्यधाम शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र शहागंज येथे अद्यावत स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारल्यास गोरगरीब महिला रुग्णांना विविध आजारावर वेळेवर उपचार मिळेल व गरोदर महिलांची प्रसूती सुलभ, सुरक्षित आणि सन्मानजनक होण्यास मदत होईल त्याकरिता त्वरीत रुग्णालय उभारण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे करुन घाटीचे अधिष्ठाता वर्षा रोटे कागीनाळकर यांना प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे पत्राव्दारे कळविले. तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत खासदार इम्तियाज जलील यानी शाहगंज येथे  स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारणीचा मुद्दा उपस्थित केला होता.

औरंगाबाद येथील मुख्यबाजारपेठ व भरगच्च नागरी वसाहतींच्या मध्यभाग असलेला शहागंज येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद अंतर्गत दुर्गाप्रसाद आरोग्यधाम शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सबब केंद्रात फक्त ओपीडी सुरु असुन तेथे गोरगरीब रुग्णांना प्रथमोपचार वैद्यकीय सेवा दिली जाते. याठिकाणी उपचाराकरिता दररोज येणाऱ्या रुग्णांमध्ये विविध आजारानेग्रस्त महिलांचे प्रमाण जास्त आहे. महिलांवर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे रेफर केले जात असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.  

औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील ग्रामीण भागातील अनेक आरोग्य केंद्रातून विविध आजाराने ग्रस्त व गरोदर महिलांना उपचाराकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) औरंगाबाद येथील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात रेफर करण्याचे प्रमाण चिंताजणक आहे, क्षमतेपेक्षा जास्त महिला उपचाराकरिता भरती होत असल्यामुळे फ्लोअर बेडची वेळ रुग्णांवर येते. वर्षभर कोणत्याही परिस्थितीत तज्ञ डॉक्टरांचा चमू आपत्कालीन रुग्ण सेवा देतात परंतु क्षमतेपेक्षा जास्त महिला रुग्ण असल्यामुळे डॉक्टर, रुग्ण व नातेवाइकांना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागतो.  

शहराच्या मध्यभागी असलेल्या दुर्गाप्रसाद आरोग्यधाम शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र येथे अद्यावत स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारल्यास घाटीच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात येणारे अधिकचे ताण तर कमी होणारच तसेच विविध आजारानेग्रस्त व प्रसूतीकरिता येणारे गरोदर महिलांना वेळेवर वैद्यकीय सेवा देण्यास मदत होईल. सबब ठिकाणी अद्यावत रुग्णालय बांधकामाकरिता जागा असुन, प्रवासासाठी विविध वाहने सुध्दा उपलब्ध असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

0 Response to "शहागंज येथे शासकीय स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारावे – खासदार इम्तियाज जलील"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe