-->
मनपाने आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवावी -पालकमंत्री सुभाष देसाई

मनपाने आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवावी -पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद, दिनांक 28,  शहर विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेत पूरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मनपाने आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मनपाच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडचे  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्यासह सर्व संबंधिंत अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी शासनाने मनपाच्या पदभरतीच्या आकृतीबंधास मान्यता दिलेली असून स्वायत्त संस्था असल्यामुळे मनपाला आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवण्याचे अधिकार  असल्याचे सांगून त्या माध्यमातून कंत्राटी पध्दती प्रतिनियुक्ती, सेवानिवृत्तधारकांना मुदत वाढ  या पध्दतीने तातडीने मनपाने पदभरती करण्याचे निर्देश ‍दिले. तसेच शहराच्या विकास कामाच्या विविध बाबींचा आढावा घेऊन श्री. देसाई यांनी सर्व विकास कामे  विहीत कालमर्यादेत पूर्ण करुन घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेची सर्व केंद्रे डिसेंबर पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे निर्देशित केले. शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेऊन  येत्या सहा महिन्यांपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आणि मनपाने एकत्रित प्रयत्नातून शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठीचे प्रयत्न करावे त्यादृष्टीने पाणी पुरवठा साठवण क्षमता वृध्दी करण्यास प्राधान्य देऊन पाण्याच्या टाक्यांची संख्या वाढवावी. शहराच्या जून्या भागातील ज्या ठिकाणी पाईपलाईन दूरुस्ती आवश्यक असेल त्याठिकाणी  ती तातडीने करुन घ्यावी, असे निर्देशित केले.

शहरातील आरोग्य आणि सौदर्यीकरण या दोन्ही दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया सुरळीत आणि पूर्ण क्षमतेने राबवणे आवश्यक असून चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी कचरा डेपोच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्था योग्यरित्या ठेवावी. त्याचसोबत हर्सूल येथील कचरा डेपोचे काम पूर्ण करुन डिसेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने सर्व कचरा केंद्राचे व्यवस्थापन ठेवण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे मनपा, एमआयडीसी, एमएसआरडीसी या तिन्ही यंत्रणांनी आपल्या अखत्यारीतील रस्त्यांची कामे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विहीत मुदतीत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. शहराच्या रस्ते कामांसाठी यंत्रणांना आवश्यक सहकार्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करु असे सांगून श्री देसाई यांनी कोवीड लसीकरण प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण करुन लवकरात लवकर सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने यंत्रणेला सूचना केल्या.

मनपाने कंत्राटी पध्दतीने भरती केलेल्या 44 जणांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात यावेळी अनिल दिवेकर, दिपक  बनसोडे, प्रफल्ल दाभाडे, सारीका भालेराव, संदीप कसारे, संजेय लहेरा, मंगेश कजबे, ज्ञानेश्वर दणके, सुधीर दाभाडे, आणि मिना कातुरे या 10 जणांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

आयुक्त श्री. पांडेय यांनी शहराच्या विविध विकास कामाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. शहराच्या पाणी साठ्यात वाढ करुन जास्तीत जास्त पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने मनपा प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने रोझाबाग, हर्सूल, दिल्लीगेट या शहरातील जून्या भागातील त्याचसोबत सिडको परिसरातील पारिजात नगर, केटली गार्डन, याठिकाणच्या जून्या पाईपलाईन दृरुस्तीचे काम करण्यात येणार असून पाणी साठवण क्षमता वाढवण्यासही प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगितले. स्मार्ट  सिटी प्रकल्पात औरंगाबाद शहर उत्तम कामगिरी करत असून देशपातळीवर क्रमवारीत 46 क्रमाकांचे स्थान मिळवले आहे. नाशिक, कोल्हापूर, सोलापूरच्या पूढे आता औरंगाबाद  शहर असल्याचे सांगून  पांडेय यांनी आतापर्यंत स्मार्ट सिटीने 12 प्रकल्प पूर्ण केले आहे. 8 प्रकल्पांचा कार्यादेश निर्गमित करून कामाची सुरुवात केली आहे. आणि 5 प्रकल्पांचा डिपी तयार होत आहे. तसेच शुक्रवारी केंद्र शासनाद्वारे औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या माझी स्मार्ट बसउपक्रमास अर्बन मोबिलिटी ह्या गटात 100 स्मार्ट सिटीज मध्ये प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले कौशल्य विकासाचे लाईटहाऊस प्रोजेक्ट अंतर्गत 6 बॅचेस पूर्ण झाल्या आहेत आणि 4 विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळाल्याचे  पाण्डेय यांनी सांगितले.

मनपाच्या विद्यार्थ्यांचे पालकमंत्र्यांकडून कौतूक

भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचा उपग्रह निर्मिती कार्यशाळा प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते औरंगाबाद मनपाच्या दहा शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. पालकमंत्री देसाई यांनी विद्यार्थ्यांसह मनपा प्रशासनाचे कौतूक केले. फाऊंडेशनद्वारा आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज 2021 उपग्रह निर्मिती करण्याच्या कार्यक्रमात 100 पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात नेण्याच्या उपक्रमात मनपाच्या दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना मिळाले. या विद्यार्थ्यांमध्ये सोनाली यादव, सूरज जाधव, विशाल वाहूळ, गुलनाज सईद सय्यद, राणी चोपडे, नंदिनी मोटे, प्रतिमा म्हस्के, साहिल केदारे, इर्शाद खान, रूपाली गायकवाड यांचा समावेश होता.

 

 


0 Response to "मनपाने आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवावी -पालकमंत्री सुभाष देसाई"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe